
बिलोली/नांदेड | बिलोली शहरातील विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची तात्काळ स्थापना करण्यात यावी तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणे, दोन आठवडी बाजार आणि संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी ठाम मागणी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड व सौ. गोदावरी गंगाधर पुपलवार यांनी बिलोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


बिलोली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने शहरात दररोज मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची वर्दळ असते. याशिवाय, शहरात भरविण्यात येणाऱ्या दोन आठवडी बाजारात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, या बाजार परिसरात तसेच शहरातील काही भागांत मोबाईल व दुचाकी चोरी, छेडछाड व टवाळखोरीचे प्रकार वाढल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


या पार्श्वभूमीवर, दोन आठवडी बाजाराच्या दिवशी अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करून नियमित गस्त वाढवावी, जेणेकरून चोरीचे प्रकार, महिलांची छेडछाड करणारे व टवाळखोरांवर वचक बसेल, अशी मागणी नगरसेविकांनी केली आहे. शहरातील बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालय परिसरात सकाळी व संध्याकाळी पोलिसांची दृश्यमान उपस्थिती राहिल्यास कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, सकाळी-संध्याकाळी वॉकिंगसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांसह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथक अत्यावश्यक असल्याचे नगरसेविका सौ. अनुपमा गायकवाड व सौ. गोदावरी पुपलवार यांनी स्पष्ट केले आहे.


टवाळखोरांची गय केली जाणार नाही – कमल शिंदे
मुली व महिलांची छेडछाड करणारे, टवाळखोरी करणाऱ्यांची कसलाही प्रकारे गय केली जाणार नाही, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिला आहे. कोणालाही त्रास देणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात येऊन किंवा मोबाईलद्वारे तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, तक्रार मिळताच कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




