नांदेड। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात सर्व गावातून आज स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवडा राबवला गेला आज या पंधरवडयाची सांगता करण्यात आली. यावेळी गावस्तरावर स्वच्छतेची शपथ, श्रमदान, स्वच्छता उपक्रमाचे उद्घाटन, गाव हागणदारीमुक्त करणे तसेच स्वच्छ माझे अंगण अभियनात उत्कृस्ट काम करणा-या कुटूंबांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समितीच्या कर्मचा-यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आदेशीत करण्यात आले होते. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी गावात उपस्थित राहून स्वच्छ भारत दिवस साजरा केला. या उपक्रमाला गावक-यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावस्तरावर स्वच्छतेचे उपक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख व अधिकरी विविध गावात उपस्थित राहून ग्रामस्थांना मागदर्शन केले. या उपक्रमासाठी गट विकास अधिकरी, विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छ भारत मिशनचे तालुका गट समन्वयक, समुह समन्वयक, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकर घेतला.
स्वच्छता अभियानात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा- आमदार तुषार राठोड
मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे आमदार तुषार राठोड यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, स्वच्छता हीच खरी सेवा आहे. गाव स्तरावर गावे स्वच्छ ठेवून आपले आरोग्य सुधारणे आवश्यक आहे. अभियानापुर्ते काम न करता नेहमी आपले गाव स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी स्वच्छ माझे अंगण या उपक्रमांतर्गत गावक-यांचा आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या हिंगमीरे मॅडम, राम पाटील चांडोळकर, कृषी बजार समितीचे अध्यक्ष कुशालराव पाटील चांडोळकर, गट विकास अधिकारी सी.एल. रामोड, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.