हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील एकंबा गावालगत असलेल्या देवसरकर यांच्या सहा एकरमधील २.५ एकर ऊस महावितरणच्या वीजतारात शॉर्टसर्कट झाल्यामुळे जळाला आहे. वेळीच हिमायतनगर येथील अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेतातील सर्व ऊस खाक होऊन गावातील गोरगरिबांच्या झोपडण्यांना आग लागून नुकसान मोठे हानी झाली असती. एकूणच या शॉर्टसर्किटच्या घटनेमुळे शेतकऱ्याचे ३ लाखाहुन अधिकचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीने तात्काळ नुकसानीची भरपाई द्यावी. अन्यथा ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार असल्याचे शेतकऱ्याने नांदेड न्यूज लाईव्हशी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील हजारो शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे.मात्र कारखान्याकडून ऊस नेण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांना उभ्या उसाची चिंता लागली आहे. कारण हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक वर्षासून झालेल्या वादळ वाऱ्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी बहुतांश पोल जमिनीकडे झुकलेला आहेत. महावितरणकडून योग्य प्रकारे देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते आहे. याकडे महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच हिमायतनगर येथील कार्यालयाचा कारभार प्रभारींवर चालविला जात असल्याने शेतकऱ्यांना डीपीसाठी अडवणूक होत आहे. त्यातच मोठ्या लाईनचे पोल जमिनीकडे झुकून शॉर्टसर्किट होण्याचे प्रकार घडू लागले असल्याची घटना रविवारी समोर आली असल्याने महावितरण अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणाचा पितळे उघडे पडले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील गावालगत विकास पाटील देवसरकर या शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. त्यांच्या सर्वे नंबर १ मध्ये शेतीत ६ एकर उसाची लागवड करण्यात आली असून, ऊस तोडणीला आलेला आहे. लागवड केलेल्या उसाच्या काठावरील धुऱ्यावर महावितरणच्या मोठ्या लाईनचा पोल उभा आहे. तो पोल जवळपास चार वर्षापासुन जमिनीकडे झुकलेल्या अवस्थेत असल्याने वीजतारा लोंबकळत आहेत. आज दिनांक १० रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोन वीजतारात घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. त्या घर्षणाने विजेची ठिणगी उसाच्या रानात पडल्याने उसाने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच तातडीने महावितरण कंपनीला माहिती दिली. तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल येईपर्यंत पाहता पाहता शेतकऱ्याच्या शेतातील २.५ ऊस जळून गेला. यात शेतकऱ्याचे अंदाजे ३ लक्ष रुपयापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे.
याचं उसाच्या फडाच्या जवळच म्हणजे एकंबा गावातील अनेक गोरगरीब नागरिकांच्या झोपड्या व घरे आहेत. अग्निशमन बंब वेळीच आले नसते तर सर्व ऊस जळून खाक होऊन आगीचे लोट एकंबा गावापर्यंत येऊन मोठी हानी झाली असती. आग लागल्याचे लक्षात आल्याने शेतकरी, परिसरातील नागरिक व गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. दैव बलवत्तर म्हणून अग्निशमन बंबाची साथ मिळाल्याने आग विझविण्यात यश आल्याने गावकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सध्या दिवस गरम आणि रात्रीला थंडी असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच घडलेली शॉर्टसर्किटची घटना शेतकऱ्यांना व गावकर्यांना नुकसान धायक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी महावितरण कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील झुकलेल्या क्माबाची दुरुस्ती करून लोम्बकळलेल्या तारांची दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी नागरीकातून पुढे येऊ लागली आहे.
महावितरणने नुकसान भरपाई द्यावी नाहीतर ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार – विकास पाटील
याबाबत विकास पाटील देवसरकर म्हणाले कि, गेल्या चार वर्षांपासून झुकलेल्या पोल बाबत मी महावितरणच्या सबंधित अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांना वारंवार सूचना दिल्या. मात्र त्यांनी येथील झुकलेला पोल आणि विजताराची दुरुस्ती केली नाही. गेल्या चार वर्षांपूर्वी हा पोल वादळी वाऱ्याने झुकून जमिनीकडे आला आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन ऊस जळाला आहे. अंदाजे ३ लाखाहून अधिकचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी नाहीतर ग्राहक मंचात तक्रार दाखल करून न्याय मागावा लागेल अशी प्रतिक्रिया शेतकरी विकास पाटील देवसरकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.