नांदेड| शालेय विद्यार्थ्यांनी सध्या भरपूर खेळावे मन लावून अभ्यास करावा आणि नंतर भविष्यात कोणते क्षेत्र महत्वाचे हे ठरवावे, असे मत नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील यांनी व्यक्त केले.


नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलीत पीपल्स हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष स.नौनिहालसिंघ जहागिरदार हे होते. यावेळी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन करतांना सीए डॉ.प्रविण पाटील म्हणाले की, आठवी, नववी पर्यंत विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे, पुस्तके वाचावीत, मन लावून अभ्यास करावा, नववी नंतर आपलं करीअर कोणत्या क्षेत्रात करायचं याचा विचार करावा.

विद्यार्थी दशेत आई-वडिलांसोबत गुरुजणांचा सन्मान करावा. खेळण्यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ऍड.चिरंजीलाल दागडीया यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव ऍड.प्रफुल्ल अग्रवाल, ऍड.चिरंजीलाल दागडीया, ऍड.प्रदीप नागापूरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सोनाली केंद्रे यांनी केले. तर कार्यक्रमास पीपल्स हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रशांत चौधरी, सौ.वाघमारे, श्री.भरणे, सौ.वाठोरे व हटकरबाई यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
