नांदेड l शालेय जीवनापासूनच विद्यार्थी हा विज्ञाननिष्ठ असावा. जोपर्यंत आपण विज्ञाननिष्ठ असणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या प्रगतीचा मार्ग सापडत नाही असे मत सुप्रसिद्ध कवी, लेखक ,कथाकार ,ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी व्यक्त केले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि राष्ट्रमाता विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित करण्यात आलेल्या संवाद कोवळ्या मनांशी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.


राष्ट्रमाता विद्यालय संभाजीनगर कॅनॉल रोड येथे आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जन्मदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि राष्ट्रमाता विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संवाद कोवळ्या मनांशी या बालकवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिगंबर क्षीरसागर यांची उपस्थिती होती .


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य देविदास फुलारी , पूर्व शिक्षण अधिकारी तथा मसापचे कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी, सह कार्यवाह राम तरटे , नागोराव डोंगरे , मुख्याध्यापक दिगंबर नरवाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. बालकवी प्रा. ललिता शिंदे बोकारे, पंडित पाटील , प्र.श्री. जाधव यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी काव्यरूपी संवाद साधला . दरम्यान शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्यंकटेश चौधरी यांचा यावेळी गौरव करण्यात आला .


संवाद कोवळ्या मनाशी या बालकवितांच्या कार्यक्रमात बालकवी पंडित पाटील यांनी माझी लाडकी नात आणि खेळ या कविता सादर करून बालकांना मनमुराद हसवले . प्रा. ललिता शिंदे बोकारे यांच्या रोबोट कविताने विद्यार्थी भारावले तर बालकवी प्र . श्री. जाधव यांच्या शाळा उघड्यावर भरली मुलांची शाळा या कवितेने दाद मिळवली . याचवेळी देविदास फुल्लारी यांनी सांगितलेल्या जंगलाचा राजा कोण या लघुबोधकथेने विद्यार्थ्यांना प्रफुलित केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्रा. रविचंद्र हाडसनकर यांनी डराव डराव , क्रिकेट आणि भक्काभक्का धूर काढीत गाडी ठेशनात आली या कविता सादर करून विद्यार्थ्यांसह उपस्थिताना मनमुराद हसवले. बालकांशी विद्यार्थ्यांचे संवाद साधताना हडसनकर पुढे म्हणाले की ,कवी होण्यासाठी आपल्या काळजावर नोंदी कराव्या लागतात. संवेदनशील मनात कविता जन्माला येते . त्यामुळे प्रत्येक कविनी बालमन समजून घेऊन ती लिहिणे आवश्यक आहे .
कविता वास्तवाचे भान ठेवणारी असावी असे सांगून त्यांनी त्यांच्या बोली भाषेतील सरावन ही कविता सादर केली. या कवितेने ही प्रचंड दाद मिळवली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जोगदंडे यांनी केले तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले. राष्ट्रमाता विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.


