हिमायतनगर, अनिल मादसवार| “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू करून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ देणारे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी महिलांच्या विकासाचे नवे पर्वच सुरू केले. या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला उदंड पाठिंबा दिला. ही योजना पुढेही कायम राहणार आहे. मात्र हिमायतनगरचा नगराध्यक्ष ‘आपल्या विचारांचा’ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केले.


दिनांक २८ रोज शुक्रवारी येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात झालेल्या जाहीर सभेत प्रचंड उत्साहात बोलताना ना. पाटील म्हणाले कि, “३० वर्षे शिवसेनेची पताका खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या राम ठाकरे यांना शिवसेनेने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. खऱ्या अर्थाने हिमायतनगरला रामराज्य आणायचे असेल तर ‘धनुष्यबाण’ या निशाणीवरील बटन दाबून नगरपंचायतीवर भगवा फडकवा!” असे आवाहन त्यांनी जनतेला केले.



अशोक चव्हाणांवर रोखठोक टीका — “पिढ्या राजकारणात, मग क्षेत्राची दुर्दशा का?”
सभेत विरोधकांना लक्ष्य करताना ना. पाटील यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्यावर तीव्र टीका केली.
ते म्हणाले कि, “तुमच्या पिढ्यान् पिढ्या राजकारणात असताना या भागाची इतकी दुर्दशा का? जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे राजकारण आता चालणार नाही.”



“शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राज्यात विकासाची गंगा” — आमदार बाबुराव कदम
यावेळी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले कि, “राज्यात एकनाथभाई यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. हा वेग कायम ठेवायचा असेल तर हिमायतनगरातील सर्व शिवसेना उमेदवारांना विजयी करा.” कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते आमदार हेमंत भाऊ पाटील, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला-पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शिवसेनेच्या घोषणांनी आणि भगव्या उत्साहाने वातावरण भारून गेले.

