हिमायतनगर, अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी कवाणा तालुका हदगाव जी.नांदेड येथे सुरु केलेल्या उपोषणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. अशी मागणी करत हिमायतनगर येथील सकल ओबीसी समाजातर्फे दिनांक 30 जुलै रोजी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन शहरातील मुख्य रस्त्याने एक ओबीसी लाख ओबीसी… आरक्षण आमच्या हक्काचं… नाही कुणाच्या बापाचं… अश्या घोषणाबाजी करत भव्य रैली काढली. यामध्ये नांदेड, हदगाव, किनवट येथील ओबीसीं समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील शेकडो ओबीसी बांधव सामील झाले होते.
ओबीसी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी दिनांक २१ जुलैपासून हदगाव तालुक्यातील कवाणा येथे अमरण उपोषण सुरु केले आहे. आजघडीला उपोषणाला दहा दिवस उलटले मात्र अद्यापही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. सुरु असलेल्या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. परिणामी सकल ओबीसी समाज बांधवातून शासणाने उपोषणाकडं केलेल्या दुर्लक्षाचा निषेध करत अनंतवार याना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी नांदेड जिल्ह्यातील तामसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. जोपर्यंत स्थानाचा प्रतिनिधी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्र दत्तात्रेय अनंतवार यांनी घेतला आहे. त्यांना सकल ओबीसी समाज बांधवाना मोठा पाठिंबा मिळतो आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सकाळपासून येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या सांख्येने उपस्थित झाले होते. या ठिकाणी उपस्थितांना प्रमुख कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर कसा अन्याय केला जात आहे. याबाबत मार्गदर्शन करून ओबीसी समाजाचा आरक्षणाचा कोठा शाबूत ठेवण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आत्तापर्यन्त ओबीसी समाजातील अनेकांना प्रमाणपत्र देखील मिळालेले नाही, त्यामुळे आम्हाला आरक्षणाचे महत्व अजून कळलेले नाही. याचा फायदा घेण्यासाठीच मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उकरून काडला आहे. त्यांना आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही.. त्यांना आरक्षण दुसऱ्या कशातून तरी द्यावं आम्ही नको म्हणत नाही. मात्र कोणताही अधिकृत सर्वे न करता शासनाने तातडीने ओबीसी समाजाचे प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊन ओबीसी प्रवर्गावर एक प्रकारे अन्याय केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला देण्यात आलेले प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे.
अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दिला आहे. एकूणच आजच्या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावून ते स्वतः देखील जातीने हजर झाले होते. रैली परत श्री परमेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर अन्य मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आंदोलनाचा समारोप करण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेऊन ओबीसी समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल आयोजकांनी आभार मानले. यावेळी ओबीसी समाजचे जिल्हाध्यक्ष खराडे, राजेश फुलारी, प्रा.कैलास राठोड, ओबीसी समाज संघटना हिमायतनगर तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, उपाध्यक्ष दिलीप राठोड, श्यामसुंदर ढगे, संतोष सातव, सुनील चव्हाण, राम पाकलवार, मारोती शिंदे, महादा आंबेडल्लू, पी. के. चव्हाण आदींसह नांदेड, हदगाव, किनवट येथून आलेले ओबीसीं समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते.