अर्धापूर| शिक्षण विभाग जि.प. नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बु. येथील माध्यमिक शिक्षीका श्रीमती नालंदा सोपानराव पाटील (भगत) यांना दि. 4 ऑक्टोंबर 2024 रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2023 ने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांच्या हस्ते सहपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथ असे होते.
श्रीमती पाटील यांनी विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , राष्ट्रीय कार्यातील असाधारण योगदानाप्रित्यर्थ तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्मिती, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, स्वच्छता अभियान, किशोरवयीन मुला- मुलींना मार्गदर्शन, समुपदेशन, शालेय परिसरात वृक्षारोपण व त्याचे संगोपन, नवसाक्षर कार्यक्रमात सहभाग यासह असंख्य भरीव योगदानासाठी श्रीमती पाटील (भगत) यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे हे उपस्थित होते. श्रीमती नालंदा पाटील यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नाटककार आ.ग. ढवळे, साहेबराव भगत, अर्धापूरकर, शिंदे, डहाळे, सुरेश भवरे, सोपानराव पाटील, सुनील बेंद्रीकर, शाळेचे मुख्याध्यापक डमरे यांनी अभिनंदन केले आहे.