हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सिरंजणी येथून पळसपूरकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, अंदाजपत्रकाला बगल आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या कामाच्या तक्रारींमुळे काम बंद ठेवण्यात आले (Siranjani-Palaspur Cement Road work rigged! Poor quality work) होते. मात्र संबंधित अभियंता व ठेकेदाराने मिलीभगत करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत पुन्हा काम सुरू केले असून, केवळ दिखाव्यासाठी काही भागावर थातुरमातुर काँक्रीट टाकून काम पूर्ण करण्याचा सपाटा सुरू केला आहे.


तक्रारदार धम्मपाल मुनेश्वर यांनी या संदर्भात थेट संबंधित अभियंत्याला दूरध्वनीवर संपर्क साधून रस्त्याच्या गुणवत्तेबाबत चौकशी केली असता, अभियंत्याने उडवा-उडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे मुनेश्वर यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर फोटोसेशनसाठी रस्त्याच्या काँक्रीट कामाच्या कोपऱ्यावर चार-पाच गजांचे तुकडे लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविण्यासाठी शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.



यापूर्वी धम्मपाल मुनेश्वर यांनी जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बांधकाम विभाग), तहसीलदार हिमायतनगर, तसेच गटविकास अधिकारी हिमायतनगर यांना लेखी तक्रार सादर केले आहे. सदर कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. दोषी गुत्तेदारास काळ्या यादीत टाकून त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी. पंचायत समितीच्या संबंधित अभियंत्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. रस्ता अंदाजपत्रकानुसार नव्याने खोदकाम करून दर्जेदार पद्धतीने पुन्हा तयार करण्यात यावा. अशी मागणी केली होती, मात्र कोणतीही चौकशी ना करता थेट काम सुरु केल्याचा आरोप मुनेश्वर यांनी केला आहे.


“या कामाचे गुणनियंत्रण मापक मशीनद्वारे तपासणी तक्रारदारासमक्ष होईपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही. तसेच या कामाचे देयकही थांबवावे, अन्यथा आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडू,” असा इशारा हिमायतनगर तालुकाध्यक्ष धम्मपाल माधव मुनेश्वर यांनी दिला आहे.


