हिमायतनगर| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे गोरगरिबांसाठी योजना आखून राज्यात उत्कृष्ट रित्या काम करीत आहेत. अहोरात्र मेहनत घेणारा मुख्यमंत्री आपणाला लाभला, ही खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे. परंतू राजकीय स्वार्थासाठी काहि लोक मुख्यमंत्र्यांना विरोध म्हणून विकासात्मक कामामध्ये खोडा घालण्याचे पाप करीत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करा म्हणून उबाठा व काँग्रेस,राष्ट्र वादी शरद पवार गट कोर्टात गेले आहेत. त्यांचा फाजील पणा हाणून पाडण्यासाठी आगामी विधान सभा निवडणुकीत महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना साथ देवून चांगल्या कामात खोडा घालणाऱ्यां विरोधकांना त्यांची त्यांना जागा दाखवून द्यावी. असे अवाहन शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डाॅ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले.
हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालयांच्या प्रांगणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान सोहळा व साडी चोळी वाटपाचा कार्यक्रम ता. १६ सोमवारी पार पडला. या वेळी आयोजित कार्यक्रमात डाॅ. ज्योतीताई वाघमारे बोलत होत्या. पुढे बोलतांना डाॅ. वाघमारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून चालले सरकार गरिबांसाठी योजना आणत असल्याने विरोधकांचे पोटसूळ उठले आहे. महामंडळ बससेवेमध्ये अर्धे तिकीट महिलांना मिळते. लेक लाडकी लखपती योजना, अन्नपूर्णा योजना अश्या अनेक प्रभावी योजना महायुतीचे सरकार चालवत आहे.
सरकार गरिबांसाठी, गरजूसाठी काम करीत असल्याचे आघाडीतील नेत्यांना बघवेना झाले आहे. म्हणून कटकारस्थाने चालू आहेत. लाडक्या बहिणींच्या खंबीरपणे पाठीशी राहून लाडकी बहिण योजना चालू करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे आपण सर्व महिला भगीनींनी उभे रहावे व आगामी विधान सभेच्या निवडणूकीत बाबुराव कदम कोहळीकर यांना आशिर्वाद देवून मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करावेत. असे अवाहन ही डाॅ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले की, सत्ता पिपासू लोक एकत्र येऊन माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. परंतू आपल्या सर्वाची मला साथ असल्यामुळे मी घाबरणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींनी मला आशिर्वाद द्यावेत. मी आपल्या सेवेत खंड पडू देणार नाही. आपण जनसेवेचे काम गेली अनेक वर्ष सातत्याने करीत आहे. अनेक गरजू गोरगरीब लोकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करून त्यांना मदत केली. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे नाव न घेता,त्यांनी घेतलेल्या आरोग्य शिबीराचे नाव तरी सांगावे. असा टोला कदमांनी लगावला. यावेळी शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगीणींची हजारोंच्या सांख्येने उपस्थिती होती.