नांदेड। राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या नांदेडच्या राजकारणात असाच काहीसा प्रत्यय पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू असलेले माजी पालकमंत्री डी. पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बुधवारी त्यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडे अर्ज देखील दाखल केला आहे. डी. पी. सावंत यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवय्या उचवल्या आहेत. तर दुसरीकडे अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांचे अनेक समर्थक देखील भाजपात गेले होते. प्रकृती ठिक नसल्याने काही महिने डी. पी. सावंत राजकारणापासून अलिप्त राहिले. मात्र सावंत यांनी आपण कोणासोबत ही भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे डी. पी. सावंत हे भाजपात जाणार की काँग्रेस मध्ये राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, काही दिवसांपूर्वी त्यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कर्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे सावंत यांनी शहरात कार्यक्रमाचे बॅनर लावले होते.
या बॅनरवर केवळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांचेच फोटो लावले होते. यावेळी त्यांनी मी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोबत राहणार अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, काल बुधवारी सावंत यांनी मी काँग्रेस सोबत आहे, असं म्हणत नांदेड उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा कॉंग्रेस पक्षाकडे व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पक्षाकडे अर्ज देखील दाखल केला आहे. सावंत यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी मागितल्याने भाजप खासदार अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभेपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसची पडझड झाली होती. अनेकजण काँग्रेसला सोडून अशोक चव्हाण यांच्यासोबत गेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. अनेकजण काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे चव्हाण समर्थक देखील काँग्रेसमध्ये घरवापसी करताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर शिंदे यांनी काल भाजप सोडून काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. अशोक यांचे कट्टर समर्थक तथा माजी महापौर जयश्री पावडे यांनी देखील काँग्रेस उमेदवारी मागितली आहे.
रविवार, ११ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे. या अनुषंगाने काल बुधवारी खासदार वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात येणाऱ्या अशोक चव्हाण समर्थकांचा विरोध केला. ”पडत्या काळात सोडून गेलेत, आता उमेदवारी साठी काँग्रेसमध्ये येत आहेत. त्यांना घेऊ नका”, असा सूर पदाधिकऱ्यांनी लावला.