नांदेड,अनिल मादसवार| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार असून, महाविकास आघाडी व महायुतीचे जागा वाटप झाले आहे. जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष वानखेडे असंतुष्ट होवून माघारी परतले. परंतू कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ते निवडणूक लढविणार आहेत. उद्या दिनांक २९ रोजी शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी ते आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
हदगाव हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सोमवार दि. २८ रोजी दाखल केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप राठोड हे सक्षम उमेदवार म्हणून निवडणूक आखाडय़ात येत असून, त्यांनी देखील सोमवारी उमेदवारी दाखल केली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट भाजप महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळाली असून, ते दिनांक २९ रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला हदगाव विधान सभेची जागा सोडण्यात आली आहे. सुभाष वानखेडे यांनी आघाडीत ही जागा शिवसेना उबाठाला सोडा अशी मागणी केलेली होती. परंतू पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही.
त्यामुळे वानखेडे नाराज झाले असून, अभी नही तो कभी नहि, म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. दिनांक २८ रोजी हादगाव येथील त्यांच्या फार्महाऊसवर जुन्या फळीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उद्या दिनांक २९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले असून, तशी पोस्ट सोशल मडिडियावर फिरत आहे. माजी आमदार सुभाष वानखेडे यांनी या मतदारसंघाचे तिन वेळा नेतृत्व केले आहे. तर एक वेळेस हिंगोली लोकसभेवर त्यांची वर्णी लागली होती. सुभाष वानखेडे यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे.
एक धाडसी आमदार म्हणून यांची मागील कारकीर्द राहिली असून, त्यांच्या कार्यकाळात कोणतेही दोन नंबरचे अवैध्य धंदे चालू दिले नाही. ना कुणाच्या टक्केवारीचा एक रुपया घेऊन ते बाटले… अतिवृष्टी सह अडचणीच्या काळात प्रसंगी हातात दंडुका घेऊन आपल्या लोकांची भूमिका मांडणारा आमदार म्हणून सुभाषराव वानखेडे यांची ख्याती आहे. यंदाच्या अतिवृष्टीच्या काळात त्यांच्या मागील कारकिर्दीचे फू सोशल मीडियावर व्हायरल करून असा धाडसी आमदार हदगाव तालुक्याला पाहिजे अशी प्रतिक्रिया मांडली होती. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली तरी निवडून येतील अशी हमी त्यांचे कार्यकर्त्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत देऊन अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह केला आहे. आता सुभाष वानखेडे अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याने ढाण्या वाघाचा आवाज पुन्हा हदगांव हिमायतनगर मध्ये घुमणार आहे. त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या निवडणुकीत रंगात येणार आहे.