नवीन नांदेड | गुरुकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळ्याला दि. २२ जानेवारी रोजी गुरुवार बाजार, सिडको येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. हा धार्मिक सोहळा दि. २८ जानेवारीपर्यंत चालणार असून दररोज दुपारी १ ते ५ या वेळेत शिवमहापुराण कथा व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिवमहापुराण कथेस भागवताचार्य ह.भ.प. श्री. अनिल महाराज (माजलगांवकर) आपल्या सुमधुर वाणीने कथा सांगत असून त्यांच्या प्रवचनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सिंथ वादक भाऊराव कनकापुरे व तबला वादक श्रीपाद गोनाकुडतेवार यांच्या सुरेल साथीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.


दररोजच्या शिवमहापुराण कथेमध्ये विविध धार्मिक देखावे, छाकी, अवतारांचे सादरीकरण, भगवान शंकर–पार्वती विवाह सोहळा, श्रीकृष्ण दर्शन अवतार आदी प्रसंग सादर केले जात असून भाविकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. विशेषतः महिलाभक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

दि. २८ जानेवारी रोजी कालाकिर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, ह.भ.प. अनिल महाराज यांच्या किर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. या शिवकथा व किर्तन सोहळ्यास शहरातील नागरिक, महिला भाविक व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुरुकृपा महिला मंडळाच्या कार्यकारिणीने केले आहे.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
संगिता रविंद्र कुलथे (अध्यक्षा), सौ. विजयाताई दत्तात्रय गोडघासे (उपाध्यक्षा), सौ. सुनिता मदनसिंह बैस (कोषाध्यक्षा), श्रीमती सुरेखा मधुसुदन ठाकूर (सचिव), सौ. सुनंदा प्रकाश वट्टमवार (सहसचिव) यांच्यासह कौशल्या दिलीपराव कदम, पार्वतीबाई शंकरराव राहेगांवकर, पंचफुला विठ्ठलराव वाळके, पुष्पाबाई मारोती मानेकर, सावित्रा गणपतराव कुरलेपवार, पार्वतीबाई मारोतराव पद्मणे, गीता राजू पेटकर, कुसूम रमेश ठाकूर, सुलाबाई बबन खानजोडे आदी सदस्य परिश्रम घेत आहेत. शिवभक्तांसाठी हा शिवमहापुराण कथा सोहळा आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचा संगम ठरत असून सिडको परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.


