बिलोली, गोविंद मुंडकर| तालुक्यातील गागलेगाव येथे शेतकरी बालाजी अरकटवाड यांच्या शेतातील निवारा अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकल्याची गंभीर घटना घडली असून, या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. निवाऱ्यासह शेतातील साहित्य, उपयुक्त वस्तू व रोजच्या कामासाठी आवश्यक साधने जळून खाक झाल्याने अरकटवाड कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.


या घटनेची माहिती मिळताच नाम फाउंडेशन, नायगाव येथील प्रतिनिधी भाऊसाहेब मोरे यांनी तातडीने गागलेगाव येथे भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. जळालेल्या शेतनिवाऱ्याची अवस्था, राखेत बदललेले साहित्य आणि शेतकऱ्याची नैराश्यपूर्ण स्थिती पाहून त्यांनी संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती नाम फाउंडेशनच्या विभागीय कार्यालयासह विविध प्रशासकीय व सेवाभावी पदाधिकाऱ्यांना दिली.

भाऊसाहेब मोरे यांच्या या भेटीमुळे अरकटवाड कुटुंबास मानसिक आधार मिळाला. “अशा कठीण प्रसंगी समाजातील संवेदनशील लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, यामुळे धैर्य मिळाले,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणींप्रती नेहमी संवेदनशील भूमिका घेणाऱ्या श्री आईलवाड मित्र मंडळ समाजसेवी समूहाने यापूर्वीच श्री बालाजी अरकटवाड यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्याला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


