नांदेड| मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सहस्रकुंड येथे सहस्र काव्यधारा या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कवी व्यंकटेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कवी संमेलनात नांदेड जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.


मराठी साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड सातत्याने अनेक उपक्रम राबवत आहे. याच उपक्रमांतर्गत अनेक कवींना हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कविता सादरीकरणाने मराठी काव्य क्षेत्राला नव्याने भरभराटी यावी यासाठीही मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने येत्या 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सहस्रकुंड येथे सहस्र काव्यधारा संमेलन पार पडणार आहे.

या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी, मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजी नगरचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन पत्रकार अनिल मादसवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


सहस्र काव्यधारा संमेलनात नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवर कवी आपल्या रचना सादर करणार असून कवी संमेलनाच्या यशस्वितेसाठी मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे कार्यवाह प्रा. महेश मोरे, उपाध्यक्ष दिगंबर कदम, उपाध्यक्ष श्रीनिवास मस्के, सहकार्यवाह राम तरटे, कवी दत्ता वंजे आदी परिश्रम घेत आहेत. सहस्र काव्यधारा संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड यांनी केले आहे.


