हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना परिसरात मंगळवारी रात्री “वाघ विहिरीत पडला” अशी माहिती वाऱ्यासारखी पसरली. सामाजिक माध्यमांवर या चर्चेला वेग आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि रात्री अनेकांची झोप उडाली.


माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सवना परिसरातील सर्व विहिरींची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र कोणत्याही विहिरीत वाघ आढळून आला नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले असून, ही चर्चा पूर्णपणे अफवा असल्याचा अधिकृत खुलासा वनपाल अमोल कदम यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना केला आहे.


वनविभागाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. भीतीचे वातावरण निर्माण न करता माहितीची खात्री करूनच पुढे प्रसारित करावी. परिसरात वन्यप्राण्यांची हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.


सध्या राज्यातील विविध भागांत वाघ व बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यात अशा अप्रमाणित बातम्यांमुळे अनावश्यक गोंधळ निर्माण होतो. सवना परिसरातील ही घटना त्याचेच ताजे उदाहरण ठरली आहे.

वनविभागाच्या तातडीच्या तपासामुळे वास्तव परिस्थिती स्पष्ट झाली असून, नागरिकांनी सजग राहण्याची, अधिकृत माहितीला प्राधान्य देण्याची आणि कोणतीही बातमी पडताळूनच प्रसारित करण्याची गरज अधोरेखित होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता—दोन्हीही जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.


