नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन रेल सुरक्षा आणि ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत अलीकडे राबविलेल्या कारवायांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. या कारवायांमुळे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आरपीएफची सतर्कता पुन्हा अधोरेखित झाली आहे.


ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत ७ मार्च रोजी नांदेड–हडपसर एक्सप्रेस (गाडी क्र. 17630) मध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा उलगडा करण्यात आला.

आरपीएफ, जीआरपी आणि सीआयबी पथकाने संयुक्त कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ अटक केली. आरोपीकडून १७.५७ ग्रॅम वजनाची सुमारे ₹४३,७०० किमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी ती जीआरपीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.


दरम्यान, ८ मार्च रोजी पिंगळी रेल्वे स्थानकाजवळ आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चार मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि तीन धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली असून जप्त मालाची किंमत सुमारे ₹१.८० लाख असल्याचे सांगण्यात आले. आरोपींना पुढील कारवाईसाठी जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला आरपीएफ व जीआरपीने ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ऑपरेशन रेल सुरक्षा अंतर्गत ७ मार्च रोजी अकोला रेल्वे स्थानकावर सिग्नलिंग केबल चोरीचा प्रयत्न उधळण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ सिग्नलिंग केबल कापत असताना दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे १० मीटर सिग्नलिंग केबल आणि गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली. आरोपींवर रेल्वे संपत्ती (बेकायदेशीर ताबा) अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ८ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेल्या १७ वर्षीय मुलाची सुटका करण्यात आली. समुपदेशनानंतर त्या मुलाला रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन सुरक्षितपणे देण्यात आले.
या सर्व कारवायांमुळे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आरपीएफची तत्परता आणि बांधिलकी अधोरेखित झाली आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

