हिमायतनगर, अनिल मादसवार| दत्त जन्मोत्सवाच्या अगोदर दत्तमूर्तीची स्थापना संपन्न झाली. दत्त जयंती सोहळा हा थाटामाटात साजरा होण्यासाठी सर्वानी रात्रंदिवस दत्तनामाचा जप करावा. असे आवाहन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज (Balayogi Venkataswami Maharaj) यांनी केले. हिमायतनगर शहरातील ढोणे गल्ली परिसरात दत्त जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी भगवान श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा मंगल सोहळा परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या शुभ सान्निधीत संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठापना विधी पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतील मंत्रोच्चारात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमा दरम्यान परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. टाळ मृदंगाच्या गजरात आणि “श्री गुरुदेव दत्त” च्या जयघोषात मोठ्या संख्येने भाविक महिला–पुरुषांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.


यावेळी डॉ.राजेंद्र वानखेडे, मारोतराव पाटील लुम्दे, अनिल ढोणे, माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, नारायणराव माने सोनारीकर, गजानन पाळजकर, राम नरवाडे, निक्कू ठाकूर, बालाजी ढोणे, दुर्गेश मांडोजवर, शुभम दांडेवाड, प्रकाश सेवनकर, पत्रकार अनिल मादसवार, सोपान बोम्पीलवार, अनिल भोरे, धम्मपाल मुनेश्वर, दत्ता पुपलवाड, विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, समाजातील मान्यवर महिला पुरुष नागरिक तसेच दत्तभक्त यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण स्वरूप दिले. प्राणप्रतिष्ठापनेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दत्त जन्मोत्सवाच्या पारंपरिक कार्यक्रमांना उद्या सुरुवात होणार आहे



