नांदेड| रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे काम जीआरपीएफ आणि आरपीएफचे आहे. परंतु नांदेड रेल्वे पोलिसांनी कहरच केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संबंधित रेल्वे पोलीस आणि अशी लूट करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत.


यामुळे नांदेड जिल्ह्यासह विभागात एकच खळबळ उडाली आहे.रेल्वे पोलीस आणि पाकीटमार यांचे साठेलोटे असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात ऐकल्या असतील परंतु आता एका अर्धवेळ रेल्वे डब्यात पाणी भरण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगार असलेल्या विद्यार्थ्यांने थेट लेखी तक्रारी अर्ज रेल्वे मंत्री पियुष गोयल, लोहमार्गचे पोलीस महासंचालक,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, रेल्वे पोलीस ठाणे नांदेड आदींना दिला असून नांदेड येथील राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांना माहितीस्तव प्रत देण्यात आली आहे.



गंगाचाळ येथील मंगेश मारोती वट्टेवाड हा युवक ओईएम बाह्यसंस्थे मार्फत नांदेड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे डब्यात पाणी सोडण्याचे काम करीत होता. तो महाविद्यालयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. तो सीटू संलग्न मजदूर कामगार संघटनेचा सभासद असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे.


२ जून रोजी तो कामावर गेल्यावर काही मोटारसायकल पार्क केलेल्या ठिकाणी आपली मोटार सायकल पार्क करीत होता. तेव्हा त्याला रेल्वे पोलीस अक्षय आणि खान आणि इतर एका पोलिसाने हटकले. त्या विद्यार्थ्याला रेल्वे स्टेशन मध्ये नेण्यात आले. त्याला मुक्त करण्यासाठी १० रुपयांची मागणी करण्यात आली. रेल्वे स्टेशन येथे कामाला असल्यामुळे विद्यार्थ्याने पैसे देण्यास नकार दिला. पैसे देत नसल्याने रेल्वे पोलिसांनी मंगेश वट्टेवाड याला हाथकडी लावली आणि पाच तास हाथकडी पेटीला बांधून जमिनीवर बसविण्यात आले. लघवीला देखील जाऊ दिले नाही.

शिक्षण व आयुष्य उध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या. तेव्हा काका यादवराव वट्टेवाड यांना रात्री ३ वाजता फोन करून अडचणीत आहे म्हणून फोन पे द्वारे 5 हजार मागितले.रेल्वे पोलिसांनी त्यांचा सहकारी सय्यद अमेर बागवान याच्या फोनपे वर रात्री ३. १४ वाजता ५ हजार रुपये फोन पे द्वारे बळजबरीने वळवून घेतले. घडलेला प्रकार कुणाला सांगितला किंवा कुठे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
नांदेड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे पोलीस, अंमली पदार्थ विक्री करणारे, खिसेकापू व सामान्य नागरिकांना धमकावून बळजबरीने पैसे काढून लूट करणारी टोळी आहे. या टोळीचा परदाफाश झाला पाहिजे. संबंधित अक्षय व खान तसेच फोनपे द्वारे पैसे घेणाऱ्यांची फोनपे हिस्ट्री तसेच फोटो निवेदना सोबत सादर करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असून त्यांनी एफआयआर करण्या संदर्भात आदेश दिले आहेत. संबंधितावर लवकरच गुन्हे दाखल होतील अशी अपेक्षा आहे जर गुन्हे दाखल झाले नाहीतर माकपचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांना भेटून पक्षाच्या वतीने निवेदन देणार आहे.


