नांदेड/हिंगोली, अनिल मादसवार | हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश बापूराव पाटिल आष्टिकर यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट तसेच माहूर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


मुसळधार पावसामुळे पैनगंगा व कयाधू नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पाण्याचा प्रवाह ओसरलेला नसल्याने कृषी विभागाला प्रत्यक्ष पाहणी करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.


याशिवाय हदगाव, किनवट, हिमायतनगर या शहरी भागांसह ग्रामीण भागात देखील अनेकांच्या घरामध्ये पूरपाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदारांनी केली.


“ही एक नैसर्गिक आपत्ती असून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने काम सुरू करून शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा,” असे आवाहन खासदार आष्टिकर यांनी केले.



