नांदेड| जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने म्हणावी तशी दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून पाऊसाने दडी मारली असल्यामुळे शेतामध्ये पेरणी केलेले सर्वच बियाणे वाया जाण्याची शक्यता वाढली आहे. पावसाअभावी दुबार पेरणीचे मोठे संकट निर्माण झाले असून त्याचा आर्थीक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडणार आहे. मध्यम व लहान शेतकरी कुटूंबांना दुबार पेरणीसाठी सद्यस्थितीमध्ये आर्थिक भार उचलणे परवडणारे नाही.


त्यामुळे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बी-बियाणे व त्यासाठी लागणारे खते व औषधी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात यावे. जेणेकरून नैसर्गीक आणि आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने दिलासा मिळेल. याबाबतचा शासनाकडे अहवाल पाठवून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याबाबतचा निर्णय व्हावा, विनंती खासदार रवींद्र चव्हाण यांनी या निवेदनात केली आहे.




