नांदेड| दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसुत्रता आणण्यासाठी व निश्चित कार्यपध्दती आवश्यक असल्याने सबंधित यंत्रणा यांना पुढीलप्रमाणे सुचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केल्या आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सर्व उपविभागीय दंडाधिकारी जिल्हा नांदेड, सर्व कार्यकारी दंडाधिकारी जिल्हा नांदेड, सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) जिल्हा नांदेड व ईतर प्राधिकरण यांना पुढीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहेत.
विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होणार नाही याकरीता संबंधित यंत्रणांनी सतर्क रहावे. त्याचप्रमाणे नियमित तपासणी करावी. विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व फटाका आस्थापनांची सर्व समावेशक तपासणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, जेणे करुन विदेशी फटाक्यांची साठवणूक आणि विक्री होणार नाही. सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्या मार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची तसेच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
अनधिकृत फटाक्यांची दुष्परिणाम या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व तालुका दंडाधिकारी व सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) जि.नांदेड यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात पत्रकार परिषदा आयोजित करुन सर्वांना मार्गदर्शन करावे व सदर कार्यात लोकसहभाग वाढविण्याकरीता जनजागृती करावी.
उपविभागीय दंडाधिकारी सर्व यांनी दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ फटाके विक्री करण्याचे परवाने मंजूर करतांना विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता मा.सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक 728/2015 मध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2018 व दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचना सर्व परवानाधारकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व याबाबत स्थानिक पातळीवर जाहिर प्रसिध्दी देण्यात यावी.
विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनिय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेल, अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी.
आगामी दिपावली सणाच्या कालावधीत आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड, सर्व उपविभागीय दंडाधिकारी जि.नांदेड, सर्व तालुका दंडाधिकारी जि.नांदेड व सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/ नगरपंचायत) जि.नांदेड यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात भरारी पथकाची नियुक्ती करावी. सदरच्या भरारी पथकाने विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ कारवाई करावी.
तसेच मा.राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशानूसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्ये दिपावली कालावधीत फटाके वाजविण्यांची वेळ सकाळी 6 ते 8 (दोन तास) आणि रात्री 8 ते 10 ( दोन तास ) असेल त्यानूसार काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबतची तपासणी हे पोलीस विभाग व सबंधित महानगरपालिका व नगरिपरिषद/नगरपंचायत करतील, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.