नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध विकासात्मक योजना गाव स्तरावर राबविण्यात येतात. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून कामे केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले.
आज बुधवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील शिवपुरी येथील कोंडलिंगेश्वर मंदिर सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी अनुष्का शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. गंगथळे, ए.एन. भोजराज, कृषी अधिकारी विजय बेतिवार, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आदींची उपस्थिती होती.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गाव स्तरावर गावे ओडिएफ प्लस मॉडेल करण्यासाठी सेगेरिकेशन शेड, ट्राय सायकल यासह सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करावीत. जलजीवन मिशन अंतर्गत गाव स्तरावर ग्रामसेवकांनी सर्वेक्षण करून शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे नळ जोडणी आहे किंवा नाही, तसेच गावातील कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे का याची माहिती संकलित करून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषदेला सादर करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी, प्रलंबित लेखा आक्षेप तसेच ग्रामपंचायत विभागातील विविध विषय, घरकुल योजना, आरोग्य, शिक्षण बांधकामसह सर्वच विभागांचा आढावा घेण्यात आला. विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुकास्तरीय यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले. सभेच्या प्रारंभी पंचायत समिती हदगावच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. समन्वय सभेच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी कैलास बळवंत, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. या समन्वय सभेत जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.