नांदेड | नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू झाली असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान व १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. नांदेड शहरात एकूण २० प्रभाग असून ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक प्रक्रिया भयमुक्त, शांततापूर्ण व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. यासाठी शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी गुन्ह्यात सहभागी असलेले गुन्हेगार, अवैध धंदे करणारे तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इसमांवर जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


त्या अनुषंगाने BNSS कलम 126, 128, 129 व 168 अंतर्गत 363 इसमांवर, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56, 57 अन्वये 20 इसमांवर हद्दपारी, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अंतर्गत 31 इसमांवर, तर एम.पी.डी.ए. अंतर्गत 03 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय BNSS कलम 163 अंतर्गत 604 इसमांवर काही कालावधीसाठी हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली आहे.

नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च घेण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी व बैठका घेत आहेत. पोलीस स्टेशन स्तरावर शांतता समिती, मोहल्ला समिती, कॉर्नर बैठका, तसेच उपविभागीय स्तरावर प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे.


मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे व हँड व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे कडक निगराणी ठेवली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 103 वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार असून सध्या सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत १३ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नाकाबंदी व पेट्रोलिंगसाठी तैनात आहेत.

महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी 01 पोलीस अधीक्षक, 02 अपर पोलीस अधीक्षक, 07 उपविभागीय पोलीस अधिकारी, 21 पोलीस निरीक्षक, 148 पोलीस अधिकारी, 1483 पोलीस अंमलदार, 12 दंगा नियंत्रण पथके, 20 स्ट्रायकिंग फोर्स, बाहेरील जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकारी व 100 अंमलदार, 01 रा.रा.पो.बल कंपनी, तसेच 1350 होमगार्ड असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, कोणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश मा. पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

