नांदेड| केवळ ३ हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अर्धवेळ महिला परिचर यांनी १९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर निदर्शने केली आहेत.


राज्यातील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ सीटू कामगार संघटनेत संलग्न झाला असून या आंदोलनास मार्गदर्शन करण्यासाठी सीटूच्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, सीटू राज्य कमिटी सभासद कॉ. करवंदा गायकवाड तसेच जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.गरजेवर आधारित किमान वेतन २१०० रुपये देण्यात यावे.नियमित सेवेत कायम करण्यात यावे. दरवर्षी गणवेश देण्यात यावा. बायोमॅट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये. दरवर्षी भाऊबीज २ हजार रुपये देण्यात यावी. आयुर्वेदिक एलोपेथीक दिस्पेन्सरी मध्ये व्यतिरिक्त साफसफाई काम करून घेतल्यास मोबदला देण्यात यावा. दर महिनाच्या ५ तारखेच्या आत मानधन देण्यात यावे. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.


राज्यामधील अंशकालीन महिला परिचर १ जुलै २०२५ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत असून सरकार त्यांचा विचार करीत नाही.जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. निवेनावर लक्ष्मीबाई बोडके, शेषाबाई कांबळे, प्रभावती दूधमल, सुनीता जाधव, मीना परले, सीमा रोहिदास आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




