नांदेड,गोविंद मुंडकर| येथील शोभा नगर ते आनंद नगर रोडवर नवीन नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचा थर देण्याच्या उद्देशाने गुत्तेदारांनी तब्बल दोन महिन्यानंतर काम सुरू केले आहे. ह्या निकृष्ट कामाबाबत मनपाच्या बांधकाम विभागाने लक्ष द्यावे आणि दिलेल्या वर्क ऑर्डर व इस्टिमेट नुसारच काम करून घ्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व नगर सुधार कृती समिती, प्रभाग क्रमांक ०४ ने केलेली आहे.


आनंदनगर ते शोभानगर रोडवरील पाण्याच्या टाकी पासून मोरगे यांच्या घरापर्यंत नळाची नवीन पाईप लाईन २० मे २०२५ च्या दरम्यान टाकली आहे. तेव्हापासून आजपर्यंत खोदकामाचे मटेरियल उचलण्यासाठी गुत्तेदाराला आज दिनांक ,, १७ ऑगस्ट २०२५ रोज रविवारी तब्बल २ महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. तोडलेल्या रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचे मटेरियल काढले असल्यामुळे रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचा थर देणार हे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्याखाली काळी माती असल्यामुळे हा रोड जड वाहनाने दबणार आहे. त्यामुळे या संदर्भात माध्यम प्रतिनिधीने मनपाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांच्याशी संपर्क केला असता, ते बाहेरगावला असल्यामुळे दिनांक १८ ऑगस्ट रोजी सोमवारी येऊन स्वतः ही बाब बघणार असल्याचे सांगितले.



प्रभाग क्रमांक ४ चे नागरिक आणि नगर सुविधा कृती समितीने घेतलेल्या बैठकीमध्ये ठरविल्यानुसार गुत्तेदाराने वर्क ऑर्डर प्रमाणे काम न केल्यास मंगळवारला आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, मनपा नांदेड आणि जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याचे माध्यम प्रतिनिधींना सांगितले. या बैठकीला सोपानराव मारकवाड, डॉ.शिवदास हमंद,दीपकराव कसबे, की. जी. देशमुख, जफारखान अहमदखान, वसंतराव ढवळे, रामकिशन इप्ते, अजमत बेग ,साहेबराव पतंगे, मा.ल. देगलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.




