नांदेड| आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृतीचे विविध उपक्रम घेतले जात आहेत.
आज जिल्ह्यातील सर्व गावांमधून उमेद अभियानातील सुमारे एक लाख 82 हजार 200 स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांनी आज सकाळी 11 वाजता एकाच वेळी विविध गावांमधून मतदान जनजागृती शपथ घेतली. या उपक्रमासाठी उमेदचे जिल्हा अभियान सहसंचालक व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले यांनी पुढाकार घेतला.
स्वयंसाहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभाग संघातील महिला यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी गावातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. लोकशाही सुदृढ करण्यासाठी आगामी निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.