नांदेड| सुदृढ भारत व्हावा या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने शुक्रवार २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार असून सलग २३ वर्षांपासून घेण्यात येणारी यंदाची चालण्याची भव्य स्पर्धा रविवार दि.२३ जून रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतु पुल, गोवर्धन घाट नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे .माध्यम प्रतिनिधीसह विविध १० गटात ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना आकर्षक मोबाईल बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
शुक्रवार दि.२१ जुन रोजी जागतिक योग दिनानिमित्त सिद्धेश्वर मंदिर गोवर्धन घाट नांदेड येथे सकाळी सहा ते सात पर्यंत योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. २३ वी अमरनाथ यात्रा ५ जूलैला व २४ वी अमरनाथ यात्रा १८ जुलैला नांदेड येथून रवाना होणार आहे. अवघड असणारी अमरनाथ यात्रा सुखकर व्हावी यासाठी अमरनाथ यात्री संघाकडून सर्व यात्रेकरूंची शारीरिक व मानसिक पूर्वतयारी करण्यात येते.त्यामध्ये एक तास पायी चालण्याचा सराव आणि पंधरा मिनिटे प्राणायाम सर्वजण करतात. दररोज यात्रेकरू विनोद सांगत असतात.
यात्रेकरूंची शारीरिक तयारी कितपत झाली याची चाचपणी या चालण्याच्या स्पर्धेमध्ये करण्यात येते. याशिवाय नागरिकांना चालण्याची सवय लागून त्यांचे आरोग्य उत्तम राहावे हा स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे.ही स्पर्धा निःशुल्क असून प्रत्येक स्पर्धकाला दोन किमी अंतर चालायचे आहे. स्पर्धेसाठी विविध गट करण्यात आले आहे. त्यामध्ये ३१ ते ४० पुरुष, ३१ ते ४० महिला, ४१ ते ६० वयोगटातील पुरुष, ४१ ते ६० वयोगटातील महिला, ६० वर्षावरील पुरुष, ६० वर्षावरील महिला, पुरुष अमरनाथ यात्री, महिला अमरनाथ यात्री, खुला गट, माध्यम प्रतिनिधी गट अश्या १० गटांमध्ये स्पर्धा होणार आहे.
प्रत्येक गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुल तर्फे आकर्षक मोबाईल देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातील यशस्वी तिघांना मंगल कार्यालय व टेन्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफीज देण्यात येणार आहेत. इच्छुकांची नावनोंदणी रविवार दि.२३ जुन रोजी सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धास्थळी करण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त नांदेडकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.