नांदेड। शौर्यदिवस 29 सप्टेंबर हा दिवस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधुन प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विरनारी, वीर पिता, विरमाता व माजी सैनिकांचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे आयेजित या कार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये ऑ. कॅप्टन विठ्ठल कदम (निवृत्त), कल्याण संघटक नांदेड यांनी शौर्यदिनाचे महत्त्व सांगत भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे उग्रवादी कॅम्पस उद्धवस्त केले व अतिरेक्याचा खात्मा केला होता. ही कार्यवाही जम्मूकश्मीर उरी येथे झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती.
या दिनानिमित्त सर्व माजी सैनिकांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सैनिकांचे जीवन खडतर असल्याचे सांगितले. माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले. सार्जेंट रामराव थडके (निवृत्त), ऑ प्रकाश कॅप्टन कस्तुरे (निवृत्त), सुभेदार अर्जुन जाधव (निवृत्त), वसतिगृह अधीक्षक नांदेड, सुभेदार बालाजी भोरगे तसेच विविध ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील डूमने, संजय जाधव, प्रकाश कस्तुरे, अनिल देवज्ञे, सुर्यकांत कदम यांनी परिश्रम घेतले.