नांदेड | दिव्यांगता ही मर्यादा नसून ती समाजाच्या दृष्टिकोनाची कसोटी आहे. योग्य संधी, सकारात्मकता आणि ठाम पाठबळ मिळाल्यास दिव्यांग व्यक्तीही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी भरारी घेऊ शकतात, असा ठाम विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी व्यक्त केला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील सायन्स कॉलेज मैदानावर या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. क्रीडाज्योत प्रज्वलन करून स्पर्धांना औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या वेळी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, सीएम फेलो भार्गवी मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, बळीराम येरपूलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


शरद देशपांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दिव्यांग व्यक्तींमध्ये क्षमतेची कमतरता नसते; गरज असते ती समाजाच्या विश्वासाची. समाजाने त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून संधी दिल्यास ते मुख्य प्रवाहात येऊन प्रेरणादायी कामगिरी करतात.

यावेळी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व क्रीडागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. विशेष शाळांतील शिक्षक हे अनेकदा पालकांच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांची काळजी घेत असल्याने या स्पर्धा आनंदी, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणे महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर दिव्यांग क्रीडा शपथ घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोलीस बँडच्या सुरेल तालावर आकर्षक पथसंचालन करत उपस्थितांची मने जिंकली. हिरवा झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला.
राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत गंजेवार यांनी केले, सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केले. विद्यार्थ्यांना भाषणे समजावून सांगण्यासाठी निखिल किरवले व साईनाथ ईप्तेकर यांनी दुभाष्य म्हणून मोलाची भूमिका बजावली.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा
जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या वतीने मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता, नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार यांनी केले आहे. ही केवळ स्पर्धा नव्हे, तर दिव्यांग सामर्थ्याचा उत्सव आहे – समाजाला नवी दिशा देणारा!

