हिमायतनगर/नांदेड। हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचाच असल्याने येत्या निवडणुकीत तो पूनश्च महाविकास आघाडीकडून सोडवून घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांना येथून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी पक्षाचे मराठवाडा प्रभारी व राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांच्याकडे नांदेड दौर्यात पदाधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाने केली.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी आपल्या नांदेड जिल्हा दौर्यात नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात दि.२२ जुलै रोजी आढावा बैठक आयोजित केली होती.त्यात हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील पक्ष कार्य, संघटनात्मक आढावा सोबतच, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी प्रणित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयात योगदान दिलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांचे अभिनंदन करुन आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टिकोनातून माहिती घेतली.



जिल्हा पक्ष निरिक्षक सौ.आशाताई भिसे,माजी आमदार प्रदिप नाईक,पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम,युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्थवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री आ.टोपे यांनी या मतदारसंघातील पक्ष संघटन,हदगांव नगरपालिका व हिमायतनगर नगरपंचायत येथिल पक्षाचे तत्कालीन नगरसेवक व त्यांचे कार्य तसेच, हिमायतनगर मधील तत्कालीन उपनगराध्यक्षासह एका नगरसेवकाचा पक्ष प्रवेश,कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या गत कांही वर्षातील निवडणूका व येथील सक्षम नेतृत्व निर्मितीचा अभाव आदी अनेक मुद्द्यावर चर्चा करतांनाच माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील ह्या स्वगृही परतल्याने बदलणारी पक्षस्थिती याबाबतीत व्यापक माहिती घेतली.त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांची घरवापसी पक्षाला येथे गतवैभव प्राप्त करून देणारी असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनाच या मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी द्यावी त्यासाठी पक्षश्रेष्ठीला साकडे घालावे अशी आग्रही मागणी शिष्टमंडळातील पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली.


त्याचबरोबर,माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी यापूर्वि या मतदारसंघातून आमदार तसेच,या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या हिंगोलीत खासदार आणि केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करतांना या भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केलेली रस्त्यांची कामे त्यातून शहर व ग्रामीण पातळीवर दळणवळणाची केलेली सुविधा,मुदखेड- आदीलाबाद रेल्वे महामार्ग ( ब्रॉडगेज),कालवा निर्मितीसह
जलसिंचनाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना दिलेला दिलासा तसेच,तत्कालीन केंद्र व राज्य सरकारकडून आणलेल्या विविध योजना व त्यातून या भागातील केलेला सर्वांगीण विकास आदी वैशिष्टय़पूर्ण विकास कामांची माहिती देऊन त्याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल असे सांगितले.

त्यास सकारात्मक दुजोरा देऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे आपल्या भावना कळवू असे अभिवचन माजी मंत्री आ.टोपे यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे हदगांव तालुकाध्यक्ष वसंतराव देशमूख, हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे,माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेदभाई,राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सरदारखान, पक्षाच्या वक्ता व प्रशिक्षण सेलचे प्रेम कौशल्ये, गंगाधर शिरफुले, किशनराव पाटील पौळ,प्रदिप धुमाळे,मौजमिल आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.


