नांदेड | राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत मिनी ऑइल मिल/एक्सपेलर (फिल्टर प्रेससह व फिल्टर प्रेसशिवाय) या घटकासाठी इच्छुक वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (FPO/FPC) महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.


कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, लाभार्थी निवडीत प्रथम शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO/FPC) प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल.


नांदेड जिल्ह्यास या योजनेसाठी 24 युनिट्सचा लक्षांक मंजूर झाला आहे. त्यापैकी फिल्टर प्रेससह मिनी ऑइल मिल/एक्सपेलर या घटकासाठी 12 युनिट्स असून प्रति युनिट कमाल ₹4 लाख अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑइल मिल/एक्सपेलर या घटकासाठी 12 युनिट्स असून प्रति युनिट कमाल ₹3 लाख अनुदान उपलब्ध आहे.



अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, सीमांत शेतकरी आणि महिला लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या 50 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर होणार असल्याने इच्छुक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विलंब न करता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

