नांदेड l आ. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थानिक शिवाजीनगरस्थित श्री नवयुवक दुर्गामाता मंडळात जिल्ह्यातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नांदेडची नवदुर्गा’ म्हणून सन्मानित करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात नवरात्रीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील एका महिलेचा दररोज सत्कार करण्यात आला.


या उपक्रमांतर्गत नांदेडच्या आई पराठा सेंटरच्या संचालिका भारती बडूरे, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळातील चालक व कर्मचारी संघटनेच्या नेत्या पद्मश्री राजे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डहाळे, यशस्वी विमा सल्लागार अरुणा कल्याणकर, एका खाजगी रुग्णालयात मदतनीस म्हणून कार्यरत अरुणा थोरात, नांदेड-मुंबई पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या सहचालक तेजश्री हंकारे, प्रभू डेरीच्या संस्थापिका चंद्रकला आल्लमखाने, भोकरच्या डॉ. सुविद्या हुलसुरे आणि १६ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणाऱ्या नांदेडच्या डॉ. सुनीता लोसरवार यांचा सन्मान करण्यात आला.


राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, आ.श्रीजया चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, भाजपचे नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर आदी मान्यवरांच्या हस्ते व श्री नवयुवक दुर्गामाता मंडळाच्या वतीने या कर्तृत्ववान महिलांना शाल, श्रीफळ, शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले.




