नांदेड| जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या विविध मागण्यांच्या उपोषणादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास एक विषारी साप (डोम्या नाग) उपोषणार्थींच्या टेंटमध्ये शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


सुमारे रात्री २:४० वाजता ही घटना घडली. उपोषणार्थी गाढ झोपेत असताना साप टेंटमध्ये आला. सुदैवाने एक उपोषणार्थी जागा होता, त्याने तत्काळ साप पाहून इशारा दिल्याने अनर्थ टळला. अन्यथा गंभीर घटना घडली असती.


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या डीवायएफआय युवक संघटना आणि सीटू कामगार संघटना यांचे उपोषण सुरू आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत, घरकुल घोटाळा चौकशी, आरडीसीच्या चपराश्याची हाकालपट्टी, वझरा शेख फरीद येथील पेसा ग्रामसभेच्या ठरावानुसार घरकुलासाठी ५ लाखांची मंजुरी, तसेच नांदेड रेल्वे पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या जबरदस्तीच्या वसुली प्रकरणी कारवाई या आणि इतर मागण्यांसाठी उपोषण चालू आहे.


सीटू व माकपचे कार्यकर्ते मागील दीड वर्षांपासून साखळी उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना माकप नांदेडचे सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड म्हणाले की, “विकसित भारत आणि अमृतकाळाच्या घोषणा देण्यात येत आहेत, पण येथे नागरिकांना न्यायासाठी दीड-दीड वर्षे उपोषण करावे लागत आहे. त्या विषारी सापापेक्षाही, विषारी सरकारच्या धोरणा आहेत.” या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सुरक्षा व उपोषणार्थींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


