नांदेड | शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात होणाऱ्या ऐतिहासिक “हिंद-दी-चादर” कार्यक्रमासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी उत्साहात न्हाऊन निघाली आहे.


दि. २४ व २५ जानेवारी रोजी हा भव्य कार्यक्रम होणार असून, प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मुक्तपणे सहभागी होता येणार आहे.

🚩 भव्य नगरकीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात
शनिवार, २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथून श्री गुरु ग्रंथ साहिब नगरकीर्तन प्रारंभ होणार आहे. हे महानगर कीर्तन गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद मार्केट, तिरंगा चौक, रामसेतू, रवी नगर, मामा चौक मार्गे मोदी मैदान (मुख्य कार्यक्रमस्थळ) येथे पोहोचणार आहे. या मार्गावरील नागरिकांनी आपल्या घरां व दुकानांसमोर फुलांची सजावट, रांगोळी व विद्युत रोषणाई करून नगरकीर्तनाचे स्वागत करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


🍛 लंगर, आरोग्य सुविधा व मोफत वाहनसेवा
कार्यक्रमादरम्यान देश-विदेशातून हजारो भाविक सहभागी होणार असून, सर्वांसाठी भव्य लंगर व्यवस्था, तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. कार्यक्रमस्थळी ये-जा करण्यासाठी मोफत वाहनसेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

🕊️ सर्वांसाठी खुला ऐतिहासिक समागम
दररोज सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणारा हा कार्यक्रम सर्व समाज घटकांसाठी खुला असून, नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. हिंद-दी-चादर हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, धर्मरक्षण, बलिदान व मानवतेच्या मूल्यांचा जागर करणारा ऐतिहासिक समागम आहे—नांदेडकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

