नांदेड| पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून हातभट्टी दारू २८८२ लिटर, दारूचे रसायन ३६१० लिटर, देशी दारु २८१० बॉटल, विदेशी दारु ७५ बॉटल असे १६६ दारुबंदी केसेस मध्ये १६९ आरोपींकडून एकूण ९ लक्ष ८१ हजार २०५ चा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या आदेशानुसार परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या जिल्ह्यात हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी दिनांक 3 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 25 ऑगस्ट व दिनांक 21.9.2024 रोजी परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘मासरेड’ चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक / सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता.
दि.21.09.2024 रोजी अवैध दारू गाळप व विक्री करणाऱ्या ठिकाणांवर धाडी टाकून दारु व्यवसायांच्या उच्चाटनासाठी, चारही जिल्ह्यांत राबविलेल्या मोहिमेमुळे, अवैध दारू गाळप व विक्री करणाऱ्या अवैध व्यवसायांविरुद्ध परिक्षेत्रात, सुमारे 166 केसेस नोंदविण्यात आल्या असून, 9,81,205/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात हातभट्टी दारू, दारूचे रसायन, देशी दारू, विदेशी दारू इत्यादी सदरांखाली केलेल्या कारवाईचा समावेश आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी जनतेला आवाहन केले कि, आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी, संबंधित पोलिसांना देऊन, पोलिसांच्या सदर मोहिमेस हातभार लावावा, असे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हंटले आहे.