नांदेड| मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत केंद्र शासनाचे आभार व्यक्त करणारा ठराव राज्य पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसंतराव मुंडकर विचार मंच नांदेडने घेतला. यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ.व्यंकटेश काब्दे, संजीव कुलकर्णी, मधुसूदन कुलथे यांची उपस्थिती होती.


दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी एक वाजता स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात हुतात्म्यांना आदरांजली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत केंद्र शासनाचे आणि याबाबत पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात यावे हा विषय अभियंता अशोक गरुडकर यांनी मांडला. प्रारंभी 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या कालावधीत तात्यासाहेब देशमुख यांचे स्मारका विषयीचे विचार आणि डॉ. शिवदास हमंद यांचे महात्मा गांधी विषयीचे विचार आणि आज करावयाची कृती या बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या.


विविध स्मारकांना भेटी देणे तेथील स्थिती सुधारण्यासाठी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधणे ही बाब या कालावधीत महत्त्वपूर्ण ठरल्या. गोविंद मुंडकर यांच्या संकल्पनेतील मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमाची बैठक 15 सप्टेंबर 2024 रोजी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या समाधी स्थळी घेण्यात आली होती.बिलोली येथील सय्यद रियाज या युवकाच्या माध्यमातून सदर विचाराचा प्रसार करण्यात आला होता. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या समाधी पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. बिलोली येथील उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी समाधी स्थळी भेट देऊन प्रशासनाच्यावतीने समाधीची देखभाल आणि स्वच्छता याविषयी पाहणी करण्यात आली.

संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. 2 ऑक्टोंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक तथा विधिज्ञ धोंडीबाराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक घेऊन या उपक्रमाचा समारोप करण्यात आला होता. याविषयीचे विवेचन या बैठकीत मांडण्यात आले आणि हुतात्म्यांच्या विषयी आदरांजली व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत केंद्र शासनाचे आणि याबाबत पाठपुरावा करणाऱ्या ज्ञात ,अज्ञात सर्वांच्या आभार व्यक्त करण्यात आले.
