नांदेड| कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी तैनात करण्यात आलेल्या एसएसटी (Static Surveillance Team) पथकाने आज मोठी कारवाई केली आहे. जकात नाका येथे तपासणी दरम्यान एका कारमधून तब्बल ₹२१ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता बिलोलीकडून कुंडलवाडी शहराकडे येणारी कार (क्र. एमएच २६ एके ७२४८) एसएसटी पथकाने तपासणीसाठी थांबवली. तपासणीदरम्यान वाहनातील लोखंडी पेटीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. या रकमेबाबत चालक समाधानकारक माहिती देऊ न शकल्याने ती तात्काळ जप्त करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.



या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेऊन तपासाची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, “सदर रोकड चौकशी पूर्ण होईपर्यंत खजिना (ट्रेझरी) कार्यालयात जमा करण्यात येईल. तपासानंतरच पुढील कारवाई ठरवली जाईल.”


या कारवाईदरम्यान नायब तहसीलदार अनिल परळीकर, मुख्याधिकारी दीपक मोरे, उपविभागीय अधिकारी दशरथ पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी घटनास्थळी भेट दिली.


हि कारवाई एसएसटी पथकातील विशाल चंदापुरे, अभिजीत धुप्पे, निशिकांत अप्पाने, तसेच पोलीस कर्मचारी मिर्झा फैय्याज बेग यांनी केली. सध्या या रकमेचा स्रोत, वाहनाचे मालकत्व आणि पैशांचा राजकीय संबंध याबाबत तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


