लोहा (प्रतिनिधी) लोहा शहरातील क्रिकेटप्रेमींना उत्साहात ठेवणाऱ्या ‘लोहा प्रीमियर लीग’ (LPL) च्या १६ व्या हंगामाचे बिगुल वाजले असून आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचा भव्य लिलाव सोहळा पार पडला. या लिलावात विशाल जाधव या खेळाडूवर सर्वाधिक १४ हजार रुपयांची बोली लावत ‘रायझिंग स्टार लोहा’ संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. त्यामुळे तो यंदाचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ ठरला आहे.


परंपरेला मिळाला आधुनिक स्पर्श
लोहा शहरात गेली सुमारे २५ वर्षे क्रिकेट स्पर्धांची परंपरा सुरू असून, सुरुवातीला ‘सहारा क्रिकेट स्पर्धा’ म्हणून ही परंपरा रुजली. प्रमोद धुतमल, रत्नाकर महाबळे, बापूसाहेब कापुरे, इमाम लदाफ, अनिल धुतमल यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा सुरू झाली होती. तत्कालीन मंत्री विनायक पाटील व आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. नंतर या स्पर्धेला नवे रूप देत ती ‘लोहा प्रीमियर लीग’ या नावाने अधिक लोकप्रिय झाली.

माजी उपनगराध्यक्ष व्यंकटेश (सोनू) संगेवार यांच्या कल्पकतेतून ही स्पर्धा तरुण खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ ठरत आहे. मैदान निर्मिती व व्यवस्थापनासाठी अनिल धुतमल व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. तर युवा नेते नवनाथ बापू चव्हाण, अमोल चव्हाण यांच्याही स्वतंत्र संघांमुळे स्पर्धेला अधिक रंगत आली आहे.


लिलावात खेळाडूंना मिळाली मोठी मागणी
विशाल जाधवसह पंकज मोटरवार, राहुल चव्हाण, गौतम कापुरे, सचिन चव्हाण, अभिषेक शिंदे, या खेळाडूंनाही संघांनी खरेदी केले. यामुळे स्थानिक व तालुकास्तरीय प्रतिभावान खेळाडूंना मोठा वाव मिळणार आहे.

८ संघ स्पर्धेत उतरणार असून, स्पर्धेत सहभागी आठ संघ व त्यांचे मालक —
तिरंगा वॉरियर्स — नगरसेवक अविनाश पवार
लोहा लायन्स — युवा नेते नवनाथ बापू चव्हाण
टायगर इलेव्हन — अंकुश जाधव
रॉयल किंग्डम — अमोल चव्हाण (ABC)
फ्रेंड्स इलेव्हन — अमोल हाके
रायझिंग स्टार — केदार खेडकर
मुंबई इंडियन्स — नगरसेवक गणेश बगाडे
युवा लेजंड्स — गटनेते भास्कर पवार

क्रिकेट सामने १३ जानेवारीपासून, बायपास रोडवरील संगेवार मैदानावर रंगणार आहेत.
प्रवेश शुल्क — ६१ हजार
खेळाडू बोली मर्यादा — ३५ हजार
जर्सी, किट, बॅट–पॅडचा खर्च — संघमालकांकडून
राजकारण बाजूला ठेवून तरुणांचा एकत्रित उपक्रम
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश (सोनू) संगेवार, अनिल धुतमल, अविनाश पवार, गजानन चव्हाण, बाळू पवार, विजय चव्हाण, माणिक चव्हाण, धीरज जोंधळे, इमाम लदाफ, आदी स्थानिक क्रीडाप्रेमी परिश्रम घेत आहेत. यंदाचा हंगाम अधिक रोमांचक आणि चुरशीचा होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

