लोहा| लोहा नगर पालिका निवडणुकीत पारंपरिक शक्तिसमीकरणांना धक्का बसत तीन दाम्पत्यांचा पराभव झाला, तर पवार–मुकदम कुटुंबांनी सहाव्यांदा आणि धुतमल कुटुंबाने पाचव्यांदा सभागृहात पुनरागमनाची नोंद केली आहे. यावेळी तब्बल १६ नवीन चेहरे पहिल्यांदाच नगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाले आहेत.


१९९८ नंतर तब्बल २७ वर्षांनी पवार पाटील परिवाराच्या हाती पुन्हा नगरपालिकेची सूत्रे गेली. ‘पवार’ आडनावाचे चार सदस्य, ‘काकू–पुतणी’ जोडी आणि धुतमल परिवारातील दोन सदस्य अशा कुटुंबीय राजकारणाच्या प्रभावी नोंदी यंदाच्या निवडणुकीत उमटल्या.

नगर पालिकेच्या स्थापनेनंतर २००८ चा अपवाद वगळता माजी सभापती व्यंकटराव मुकदम यांच्या कुटुंबाने सहा वेळा नेतृत्व केले आहे. माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम तीन वेळा तर माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांनी तीन कार्यकाळांचे प्रतिनिधित्व केले आहे. पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या परंपरेत त्यांचे नातू अविनाश पवार यांची यंदा विक्रमी मताधिक्याने निवड झाली. धुतमल परिवाराचीही पाचवी टर्म नोंदली गेली असून लक्ष्मी धुतमल विजयी ठरल्या. नगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक करिम शेख व सुशीलादेवी परिहार यांची तिसरी टर्म नोंदली गेली आहे.


तीन दाम्पत्य व आई–वडील–मुलगा तिघे पराभूत
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी व पत्नी गोदावरीताई (प्रभाग ७) पराभूत झाले. सचिन व सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग १ व ८) यांनाही पराभवाचा धक्का बसला. प्रभाग ३ मध्ये माजी नगरसेवक आजमोद्दीन शेख, बानूबी शेख व त्यांचा मुलगा शरफोद्दीन शेख — तिघेही पराभूत झाले.काँग्रेसकडून लढलेले माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार पराभूत झाले; मात्र पत्नी गीतांजली संगेवार विजयी ठरल्या. तर प्रभाग २ — लक्ष्मी छत्रपती धुतमल, प्रभाग ४ — पूजा केतन खिल्लारे–धुतमल काकू–पुतणी या दोघीही एकाच सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत.

पहिल्यांदाच १६ नवीन चेहरे
सदाशिव तेलंग, पार्वतीबाई जंगले, लक्ष्मी धुतमल, गणेश बगाडे, हबीब शेख (भाजप), गीतांजली संगेवार (काँग्रेस), पूजा खिल्लारे–धुतमल, सतीश निखाते, तुकाराम दाढेल, भागाबाई पवार, रमाबाई मंजलवाड, अविनाश पवार, माधुरी बोडके, हरिभाऊ चव्हाण, अनिता यलरवाड, सुशीला कहाळेकर (शिवबाठा).

