हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या दिघी गावासह परिसरातील भूमिहीन शेत – मजुरदारांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आज (10 सप्टेंबर) बुधवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.


गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे जवळपास 90 ते 100 टक्के पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. परिणामी शेतमजुरदारांच्या उपजीविकेवर गदा आली असून, त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येणारा दसरा दिवाळी सन कसा साजरा करायची आपल कुटुंब कस चालवायच मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न भूमिहीन शेतमजूरदारा समोर उभा टाकला आहे.



यावेळी मोर्चेकर्यांनी शेतमजुरदारांच्या प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार याना दिले. यामध्ये भूमिहीन शेतमजुरदारांना गायरान जमिनीतून जमिनीचे वाटप करावे. शेतमजुरदार कुटुंबातील कुणाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 15 लाख रुपये मदत द्यावी. पूर परिस्थितीमुळे काम बंद झाल्याने प्रत्येक कुटुंबाला ₹25,000/- तात्काळ आर्थिक मदत द्यावी. पुर परिस्थितीमुळे जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे शेत मजुरदारांचे हाताचे काम गेले. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने रोजगार हमी योजना सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.



हा मोर्चा हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मुख्य कमान येथून सुरू होऊन मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन समिती नांदेड, तहसील कार्यालय तसेच पोलिस प्रशासनास देण्यात आल्या. हा मोर्चा राजू किसन गायकवाड व उत्तम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यात मोठ्या संख्येने महिला व पुरुष मजुरदार सहभागी झाले होते.



