नांदेड | पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने ‘नरेंद्र – देवेंद्र महोत्सव २०२६’ या भव्य सांस्कृतिक पर्वाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव दि. २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड येथील कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान येथे हजारो रसिकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. हास्य, काव्य, पुरस्कार वितरण आणि लोकसहभाग यांचा सुरेख संगम असलेल्या या महोत्सवाची माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली.


महोत्सवाच्या पहिल्या दिवशी – शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत १४ वा मराठी हास्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पुण्याचे स्टँडअप कॉमेडीचे बादशहा बंडा जोशी, ‘झी हास्य सम्राट’ फेम सिद्धार्थ खिल्लारे (परभणी) तसेच नांदेडचे लोकप्रिय शाहीर रमेश गिरी रसिकांचे भरभरून मनोरंजन करणार आहेत.

या दिवशी विशेष आकर्षण म्हणून ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम सादर होणार असून, ‘चला हवा येऊ द्या’ फेम सतीश कासेवाड हे कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते असतील. या स्पर्धेत पाच विजेत्या महिलांना पैठणी, तर वीस महिलांना आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी – रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत २४ वे अखिल भारतीय विराट हिंदी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.


देशभरातील नामवंत कवी या संमेलनात सहभागी होणार असून, त्यामध्ये मेरठ (उ.प्र.) येथील हास्य संचालक व क्रांती कवी सौरभ जैन सुमन, जबलपूरचे हास्य गीतकार सुदीप भोला, भिलवाडा (राजस्थान) येथील व्यंग्य कवी दीपक पारेख, मैनपुरी (उ.प्र.) येथील वीररस कवी डॉ. मनोज चौहान, सुरत (गुजरात) येथील शृंगार रस कवयित्री सोनल जैन तसेच दिल्लीच्या वीररस कवयित्री नेहा शर्मा ‘नमन’ यांचा समावेश आहे.

या महोत्सवात नांदेड भूषण पुरस्कार तसेच सुधाकर पत्र भूषण पुरस्कार वितरणाचाही भव्य सोहळा पार पडणार आहे. हास्य, काव्य आणि सन्मान यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद राठी व भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

