हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला असून, शुक्रवारी हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. हदगाव येथील वसंत लॉजमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीदरम्यान दोन गटांत जोरदार वाद झाला. या घटनेनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अद्याप कोणत्याही आरोपीची अटक झालेली नाही.


गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीत ‘बाहेरील हस्तक्षेप’ आणि दलालांच्या वाढत्या प्रभावामुळे असंतोष निर्माण झाला होता. निष्ठावंत कार्यकर्ते उपेक्षित राहत असून काही निवडक कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत होता. हा असंतोष अखेर शुक्रवारी उफाळून आला.

हदगाव येथील वसंत लॉजमध्ये आयोजित बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते अविनाश भोसीकर व दिलीप आला राठोड उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत निरीक्षक दिलीप आला राठोड यांच्याकडे पक्षाचे एबी फॉर्म असतानाही त्यांनी पत्नीला पक्षाचा एबी फॉर्म न देता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. याच मुद्द्यावर जाब विचारण्यासाठी माजी तालुकाध्यक्ष रविराज दूधकावडे, रावसाहेब कदम, योगेश लव्हाळे, गणेश मुनेश्वर, वैशाली मुनेश्वर, सुनिता कदम आदी बैठकीला उपस्थित होते.


बैठकीदरम्यान शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी रविराज जळबाराव दूधकावडे (रा. कांडली) यांनी हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चर्चेदरम्यान आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली, महिला साक्षीदाराचा हात धरून ओढले, तिला ढकलले व विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून दिलीप आला राठोड व अविनाश विश्वनाथ भोसीकर यांच्याविरोधात विनयभंग तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिलीप आला राठोड यांच्या तक्रारीवरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबिरे (पालमकर), रविराज दूधकावडे, रावसाहेब कदम, योगेश लव्हाळे, गणेश मुनेश्वर, वैशाली मुनेश्वर व सुनिता कदम यांच्याविरोधात बैठकीत वाद घालणे, कट रचून मारहाणीसाठी धाव घेणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच हातातील सोन्याची अंगठी काढून घेतल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके व पोलीस उपनिरीक्षक राजेश नंद करीत आहेत. दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
वाद थेट पक्षाध्यक्षांपर्यंत; जिल्हा कार्यकारणी बरखास्त
हदगाव शहरातील हा अंतर्गत वाद थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचला आहे. अंतर्गत वादामुळे पक्षाची मोठी बदनामी झाल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने नांदेड जिल्हा कार्यकारणी तात्काळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

