पैसा, जात, धर्म आणि स्वार्थापलीकडे जाणारा मतदारच देशाचे भविष्य घडवतो. लोकशाही ही केवळ एक राजकीय पद्धती नाही, तर ती प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीची, नैतिकतेची आणि सुजाणतेची कसोटी आहे. निवडणुका हा लोकशाहीचा सण असला तरी, त्याची खरी शोभा फक्त तेव्हाच वाढते जेव्हा मतदार आपला हक्क समजून, स्वार्थ बाजूला ठेवून, केवळ देशहितासाठी मतदान करतो.


आजचा काळ पाहता, चांगला मतदार हा चांगला नेता निवडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. प्रामाणिक, दूरदृष्टी असलेला आणि सक्षम नेता निवडण्यासाठी मतदाराच्या जागरूकतेला पर्याय नाही. परंतु, जात-धर्माच्या गोटात अडकलेला, पैशाने विकला जाणारा, दारू व इतर प्रलोभनात बुडालेला, आणि स्वार्थासाठी मतदान करणारा मतदार लोकशाहीला मारक ठरतो. अशा मतदारामुळे नेत्यांची मस्ती वाढते, सत्तेचा गैरवापर होतो आणि भ्रष्टाचार बळावतो.


मतदान प्रक्रिया आणि मतदारांच्या मानसिकतेत सुधारणा करणे ही आता केवळ सामाजिक नव्हे तर राष्ट्रीय गरज झाली आहे. लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी मतदार जागृती ही सततची चळवळ असली पाहिजे.


याच उद्देशाने नांदेडच्या शोभा नगर भागात क्रांती दिनानिमित्त एक विशेष बैठक झाली. विविध क्षेत्रातील समाजधुरीण, व्यापारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले. मतदानाचे महत्त्व, प्रामाणिक उमेदवाराची निवड, जाती-धर्माच्या पलीकडे जाणे आणि प्रलोभनांना बळी न पडणे यावर सखोल चर्चा झाली. युवकांनी सोशल मीडियाचा वापर करून जागृती मोहिमा राबवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले की नांदेडमधून सुरू झालेली ही जनजागृती केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर आणि देशभर पोहोचवली पाहिजे. कारण — “चांगला मतदारच चांगला नेता घडवतो, आणि चांगला नेता चांगले राष्ट्र घडवतो.”
संपर्क -गोविंद मुंडकर,स्वातंत्र्य सैनिक नगर, नांदेड. मोबाईल ८३२९०९५३०३


