नांदेड| शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्या घेवून आयएफटीयु ट्रेड युनियनच्या वतीने कॉ.डी.एन.घायाळे यांच्या नेतृत्वात शनिवार दि.5 ऑक्टोबर पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आलेे आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायाला भिंगरी बांधुन संपुर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेचा गवगवा करीत असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करणार्या शालेय पोषण आहार कामगारांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज आम्हाला आंदोलन करण्याची पाळी येत असल्याचे उपस्थित आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
केंद्र व राज्य शासनाने आगामी काळात होवू घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णयांचा धडाका लावल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कामगारांना मात्र शासन, प्रशासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ताटकळत ठेवले आहे. मेटाकुटीस आलेल्या शालेय पोषण आहार कामगारांना न्याय मिळावा हा उदात्त हेतु समोर ठेवून शालेय पोषण आहार कामगारांना शासकीय सेवेत घेवून दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात यावे.
शालेय पोषण आहार कामगारांच्या शासकीय जाचक अटी त्वरीत रद्द करण्यात याव्यात, शालेय व्यवस्थापन समिती तात्काळ बरखास्त करावी, शालेय पोषण आहार कामगारांना दिवाळी बोनस म्हणून दहा हजार रुपये देण्यात यावे तसेच दोन गणवेश देण्यात यावे, शाळेत पोषण आहार कामगारांना गॅस शेगडी व भांडे देण्यात यावे त्याच बरोबर गॅस दुरुस्ती करणार्या मॅकनिकची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, शालेय पोषण आहार कामगाराकडून शाळा व प्रांगण झाडणे,शौचालय साफ करणे त्वरित बंद करावे.
राष्ट्रध्वजाची रखवाली करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा, केळी, अंडी, इंधन बिल शालेय पोषण आहार कामगारांच्या खात्यावर अदा करावे, 2023-2024 च्या वाढीव मानधनाचा जीआर त्वरीत काढावा या व अन्य मागण्यांसाठी आयएफटीयु ट्रेड युनियनच्यावतीने कॉ.डी.एन.घायाळे यांच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कामगारांचे शनिवार दि.5 ऑक्टोबर पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात कॉ.रामदास पांचाळ, कॉ.बळीराम गायकवाड, कॉ.मारोती हरबळे, कॉ.नागोराव शिंदे, कॉ.पिराजी कारकुण, कॉ.श्रीराम इंगळे, पत्रकार आनंदा बोकारे यांच्यासह अन्य शालेय पोषण आहार कामगार उपस्थिती होते.