कंधार, सचिन मोरे| मी तुमचं लेकरू असून तुमचा माझ्यावर हक्क आहे तुम्ही माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या आशीर्वादामुळेच मी आमदार होऊन यशस्वी कामगिरी बजावू शकलो. आगामी निवडणुकीत नगरपरिषद माझ्या ताब्यात द्या. शहराचा चेहरा मोहरा बदलणार अशी ग्वाही लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.


कंधार शहरातील ६ कोटी ७४ लक्ष रुपयाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता आमदार चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते माजी सभापती बाबुराव केंद्रे उमरगेकर, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी स्वप्निल पा लुंगारे, म. जफरोद्दीन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन किशनराव डफडे,मधुकर पा. डांगे, सा. बा.चे उप अभियंता सुमित पाटील, मुख्याधिकारी भोळे, मारोती गायकवाड, उत्तम पाटील जाधव, दत्तात्रय चंदनफुले, म. आसेफ, निलेश गौर, गंगाधर कांबळे, चेतन केंद्रे,अनुसया केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी शहरवासींच्या वतीने ठिकठिकाणी आमदार चिखलीकर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना आमदार चिखलीकर म्हणाले, शहराचा विकास कोण करू शकतो? गोर- गरीब जनतेच्या अडचणी कोण सोडवते? हे सर्व काही कंधारच्या जनतेस माहिती आहे. पैशाच्या जोरावर काहीजण राजकारण करीत असून पैसे वाटून कंधारचे वाटोळे काहीजण करीत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला.


शहरातील गोरगरिबाच्या लेकरांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अशी अभ्यासिका निर्माण करण्यासाठी २५ लक्ष रुपये व अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २० लक्ष रुपयांचा निधी आमदार चिखलीकर यांनी यावेळी जाहीर केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास कांबळे, विकास कांबळे,महेश मोरे, मनोज कांबळे,राहुल वाघमारे,कांचनकुमार गुंडेकर यांनी परिश्रम घेतले.


