नांदेड| “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजातील समाज बांधवानी या कार्यक्रमास मोठया प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


रविवार 7 डिसेंबर रोजी नागपूर येथील सुरेश चंद्र सुरी ग्राउंड, खसरा नंबर 168, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा येथे सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन व गुरूनानक नाम लेवा संगत सिख, सिखलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजामार्फत राज्यात नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड या तीन ठिकाणी ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या अनन्यसाधारण शहीदीचे महत्व तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजाचे श्री गुरू तेग बहादूर साहीबजी यांचेशी असलेले ऐतिहासिक नाते-संबंध अधिक दृढ होऊन राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक ऐक्य वृध्दींगत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.



