नांदेड| “हिंद-दी-चादर” उपक्रमाअंतर्गत आयोजित श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर सेवेत सहभाग घेत भाविकांची सेवा केली.


रांगेत बसलेल्या भाविकांना स्वतः लंगर वाढताना पाहून उपस्थितांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाचा प्रमुख अधिकारी सेवाभावाने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला विशेष सामाजिक व आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

लंगर ही सेवा, समता व बंधुभाव यांचे प्रतीक असून, या परंपरेत सहभागी होत जिल्हाधिकाऱ्यांनी शीख धर्मातील मानवता, समानता आणि निःस्वार्थ सेवाभावाच्या मूल्यांना अभिवादन केले. या ठिकाणी सुरू असलेली लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली ठेवण्यात आली आहे.


शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असून, संपूर्ण परिसर भक्ती, सेवा आणि श्रद्धेच्या वातावरणाने भारलेला दिसून येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या महान संदेशाचा प्रभावी जागर करण्यात येत आहे.


