हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत सर्वत्रिक निवडणुकीची धावपळ सुरू असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषांचे षडयंत्र तीव्र होत चालल्याची गंभीर चर्चा नागरिकांत सुरू आहे. निवडणुकीत पैसा, दडपशाही व प्रलोभनांचा वाढता वापर लोकशाहीसाठी घातक ठरणारा आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महिलांना 500 रुपये तर पुरुषांना 700 रुपये रोजच्या हजेरीसाठी, तसेच मतांच्या बदल्यात 10 ते 12 हजार रुपयांचा भाव ठरविण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

महात्मा गांधींच्या नावाचा वापर करून सुरू असलेल्या काही प्रचार मोहिमा ‘सत्य-अहिंसा’च्या विचारांना विरोधात जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नुकतेच नमनीर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी झालेल्या राजकीय गोंधळाने निवडणुकीत होत असलेल्या गैरप्रकाराला पुष्टी मिळू लागली आहे.


आगामी काळात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर वाढेल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली असून, निवडणूक प्रक्रिया व्यापारासारखी बनल्याची नाराजी सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे. लोकशाहीला कलंक लावणाऱ्या या प्रकारांवर प्रशासन व निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.


