हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामानंतरही गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले दोन्ही बाजूच्या नाल्याचे काम नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर अलीकडेच सुरू झाले आहे. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निष्काळजीपणा होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ गड्डमवार यांनी केला आहे.


गड्डमवार यांनी सांगितले की, नाल्याचे सिमेंट काँक्रीट थेट नालीतील पाण्यात टाकून निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात आहे, ज्यामुळे संपूर्ण रस्त्याचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. त्यांनी संबंधित ठेकेदार, अभियंते आणि महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे.



“नालीच्या कामाचे संपूर्ण अंदाजपत्रक मिळेपर्यंत आम्ही हे काम पुढे होऊ देणार नाही. जर हे काम रात्रीच्या वेळी करण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,” असा इशारा गड्डमवार यांनी दिला. नागरिकांमध्ये या निकृष्ट कामाबद्दल तीव्र संताप असून, प्रशासनाने तातडीने चौकशी करून अंदाजपत्रक प्रमाणे नालीचे दर्जेदार काम करून द्यावे आणि संबंधित ठेजेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.



